गमभन (एक आढावा)

गरज
डिसेंबर २००५ - जाने. २००६ च्या सुमारास मनोगताशिवाय करमत नसे. डायल अप कनेक्शन वापरून मनोगतावर येणे आणि लिखाण करणे ही वेळखाऊ आणि खर्चिक बाब होती. त्यामुळे घरबसल्या वापरता येण्याजोगी मनोगतासारखी टंकलेखन सुविधा आहे का ह्याचा शोध घ्यायला मी सुरुवात केली. त्यावेळी फारसे काही हाती लागले नाही. या कारणास्तव आपण स्वतःच अशी एखादी सुविधा निर्माण करावी ह्या कल्पनेने बाळसे धरले. त्यानुसार मग मी विविध पर्याय शोधण्यास सुरुवात केली. ऍप्लिकेशन की टूल, वेब बेस्ड सर्व्हिस की स्टँडअलोन सोय असे अनेक पर्याय डोळ्यासमोर होते. त्यानुसार व्हीबी मध्ये ऍप्लिकेशन तयार करवे असे मनात आले. परंतु हे केवळ विंडोज पुरतेच मर्यादित राहणार असल्याने हा पर्याय सोडून दिला. महाजालावरही वापरता आवे आणि घरीही इंटरनेट जोडणीशिवाय काम व्हावे हा मुख्य हेतू असल्याने अखेर जावास्क्रिप्ट वापरून प्राथमिक सोय तयार करण्याचा मी निर्णय घेतला. याच सुमारास मी मनोगताचय प्रशासकांना त्यांची सुविधा घरगुती वापरकरता उपल्ब्ध करता येईल का याचीही विचारणा केली. परंतु त्यास प्रतिसाद न आल्याने अखेर अशी सोय मोफत आणि मुक्तस्रोत स्वरूपात लोकांना द्यायचीच ह्या इरेस मी पेटलो. यासुमारास यादगार उर्फ अभिमन्यू आळतेकर यांच्याशी ह्यासंबंधात चर्चा केली होती. त्यांनी फायरफॉक्सच्या मदतीने मनोगताची सुविधा तात्पुरती कशी घरबसल्या वापरता येऊ शकते यासंबंधीचे प्रयोग केले होते. त्यातून युनिकोड, लिप्यंतरण, डायनॅमिक फॉँन्ट्स् इ. संबंधीची प्राथमिक माहिती कळली. ह्याचवेळी चित्तरंजन भट यांच्याशी याचसंदर्भात बोलणी चालू होती आणि अश्या सुविधेच्या निर्मितीची संकल्पना जोर धरू लागली.

बाळबोध आवृत्ती

फेब्रु. २००६ च्या सुमारास टंकलेखन करण्याकरता सुविधेची पहिली वापरण्यायोग्य बाळबोध आवृत्ती तयार करण्यात मला यश मिळाले. या आवृत्तीमध्ये देवनागरी, गुजराती आणि रोमन लिप्यांमध्ये केवळ इंटरनेट एक्सप्लोरर वर टंकलेखन करता येत असे. त्याचे आज्ञायन क्लिष्ट नसले तरी समजण्यास मात्र कठीण होते. चुकांमधून शिकत शिकत एकेक कळ दाबल्यावर काय उमटायला हवे काय नको, कुठे काय चुकते आहे इ. इ. बघत, चाचपडत आज्ञायन सुधारत गेलो. थोडक्यात पॅचवर्क करत करत पहिली वापरण्यायोग्य आवृत्ती तयार झाली. ह्या सुविधेला काय नाव द्यायचे असा प्रश्न होता. ती लेखनाची प्राथमिक सोय आणि अवस्था होती म्हणून मी त्यास गमभन असे नाव दिले. गमभन वापरण्यायोग्य करण्यास ते महाजालावर होस्ट करणे गरजेचे होते. फेब्रुवारी अखेरीस काही फ्री डोमेन्स जसे वेबसाम्बा, सीजेबी डॉट नेट इ. वर मी ही सोय चढवली आणि मनोगतावरच त्यास प्रथम प्रसिद्धी दिली. चित्र पहा आठवडाभरताच मनोगतावरचा माझा मित्र मयुरेष वैद्य याने त्याच्या डोमेनवर गमभन ठेवण्याकरता नि:शुल्क सोय आणि परवानगी दिली. त्यावेळी गमभन मध्ये बंगाली आणि गुरुमुखी लिप्यांची जोडणी झाली होती. गमभनला पहिले हक्काचे घर तेव्हा मिळाले चित्र पहा . त्यानंतर आजवर गमभनचा सारा वाढता पसारा इथेच नांदतो आहे. याबद्दल त्याचे उपकार सांगावे तितके कमीच.

धक्केबुक्के
            ह्या आवृत्तीनंतर ही सुविधा फायरफॉक्समध्ये कशी चालवता येईल याबबत मी चाचपणी करू लागलो. तेव्हा असे लक्षात आले की मी जसे आज्ञायन केले आहे त्यानुसार गमभन फायरफॉक्सवर कधीच चालू शकणार नाही. माझ्याकरता हा मोठा धक्का होता. कंपॅटिबिलिटीच्या निकषानुसार गमभन अगदीच निकामी ठरणार होते. मी महाजालावर अशी कोणती सुविधा आहे का ह्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि जुलै-ऑगस्टच्या सुमारास मला Ekushey Unicode Parser @author Hasin Hayder. http://hasin.wordpress.com यांची लिप्यंतरण सुविधा दिसली. मूळ बंगाली भाषेकरता तयार केलेली ही सुविधा फायरफॉक्स आणि आयई दोन्हीवर उत्तम प्रकारे काम करत होती. मोफत आणि मुक्तस्रोत असणार्‍या ही सुविधा पाहून हुरूप आला. ह्याचा अभ्यास करताना लक्षात आले की गमभनचा मूळ गाभाच बदलावा लागणार आहे. हे काम मोठे, कष्टप्रद आणि वेळखाऊ होते. पण हे काम करण्याचा मी चंगच बांधला होता. पण म्हणावे तसे यश येत नव्हते.

बदल...मजल...दरमजल
          एकीकडे नव्या आवृत्तीवर काम करत असताना आधीच्या आवृत्तीतील त्रुटी दूर सारणे, नवनव्या सोई करणे ही कामेदेखील करत होतो. त्यावेळी मनोगतावरचे सदस्य दंतकर्मी यांनी गमभन मध्ये फाईल सेव्ह करता येईल की अशी विचारणा केली. थोड्या श्रमांतच अशी सोय करता आली. चित्र पहा  कामानिमित्त इस्रायलचा दौरा करून आलो होतो. इस्रायलला असताना हिब्रू लिपीशी तोंडओळख झाली होती. प्रयोग म्हणून ऑगस्ट ०६ च्या सुमारास हिब्रूकरता गमभनची एक बाळबोध आवृत्ती तयार केली होती. चित्र पहा  माझ्या कार्यक्षेत्रातील इस्रायलच्या मित्रांना मी त्याचे परीक्षण करण्यास सांगितले होते. प्राथमिक सोय म्हणून वापरण्यायोग्य असले तरी माझ्या हिब्रू लिपीच्या जुजबी ज्ञानामुळे ह्यात अनेक चुका होत्या. माझ्या सहकार्‍यांनी त्या निदर्शनास आणून दिल्या. शेवटी हा प्रयोग मी तात्पुरता गुंडाळला तो गुंडाळलाच.

लेखन श्रीमंती आणि तडजोड
        ऑगस्ट-सप्टेंबरच्या सुमारास चित्तरंजन यांनी गमभन मध्ये रीच् टेक्स्ट एडिटिंग करण्यास सुचवले. म्हणावे तर काम तसे सोपेही होते आणि अवघडही. महाजालावर अशी सुविधा कशी तयार करावी ह्यासंबंधी अनेक लेख, उदाहरणे मिळाली. परंतु मूळात गमभन फायरफॉक्स वर चालतच नसल्याने मी ह्याकरता करू शकेन असे बदल किती उपयुक्त ठरतील याबद्दल साशंक होतो. बांगला युनिकोड पार्सर ने प्रेरित होऊन मी गमभनचा गाभा बदलण्याचे मुख्य काम हाती घेतले. त्याचसोबत रिचटेक्स्ट एडिटिंगचे कामही करायला लागलो. एडिटेबल डिव्ह टॅग वापरून रिचटेक्स्ट एडिटिंग शक्य असल्याचे मला कळले त्यानुसार मी आज्ञायन सुरू केले. सोबतच गमभनच्या नव्या गाभ्याचे कामही पूर्ण होत आले होते. चाचण्या चालू होत्या. हा टप्पा तसा बराच लांबला. ऑक्टोबरच्या सुमारास जुजबी चाचण्या करून मी गमभनची नवी आवृत्ती ६.११.१ जालावर चढवली. चित्र पहा  यात रिचटेक्स्ट एडिटिंग आणि फायरफॉक्स मध्ये चालू शकणारे आज्ञायन केले होते. दुर्दैवाने डिव्ह टॅग फायफॉक्स मध्ये एडीटेबल नसतो हे मला उशिरा कळले. त्यामुळे ही सोय केवळ आयईवरच वापरता येऊ शकणार होती. एकूण गैरसोय नसली तरी ही अखेर तडजोडच होती ज्याकरता मी समाधानी नव्हतो. तरीही फायरफॉक्स मध्ये साधे टंकलेखन शक्य असल्याने मी ह्या आवृत्तीला जालावर चढवले. ६.११.१ अशी आवृत्ती काढण्याचे एक कारण असे होते की ही आवृत्ती नोव्हेंबर २००६ पर्यंत विकसनशील राहील याबाबत मला अंदाज होता. दंतकर्मी यांनी फाईल सेव्ह करता येत होती पण उघडायची कशी हा प्रश्न होता. तो प्रश्न सोडवून आणि इतर काही त्रुटींचे निराकरण करून थोडी सुधारित आवृत्ती ६.११.१८ ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मी जालावर चढवली.चित्र पहा  ह्यात वापरलेल्या सार्‍या जावा पुस्तिकांचे एकूण आकारमान होते ६३.५ कि.बा.!

जतुदितउजा ( जसे तुम्हाला दिसते तसे उमटत जाते) आणि गमभन
                 एडीटेबल डिव्ह टॅग ही खरेतर तडजोड होती. समस्येवर योग्य उपाय शोधण्याकरता मी परत महाजालावर शोध घेऊ लागलो. शोध घेत असताना एक Cross-Browser Rich Text Editor http://www.kevinroth.com/rte/demo.htm इथे सापडला. ह्यात गमभनचे बदल करून मला ही सुविधा आयई वर अगदी सहज चालवता आली परंतू फायरफॉक्सवर चालवणे जमत नव्हते. नुसती चाचपणी करत राहण्याऐवजी समस्येचे मूळ शोधायची वेळ आली होती. त्यासाठी गमभनच्या तंत्रात काही बदल करावे असे मी ठरवले. कोणताही एडीटेबल टॅग असो, त्याला गमभन जोडण्याकरता केवळ एक फंक्शन असले पाहिजे असे मी ठरवले. ब्राऊजर्सनुसार इव्हेंट हाताळणे, कळफलकावरचे संदेश ओळखणे, एडीटेबल टॅगचा प्रकार ओळखून त्यानुसार योग्यप्रकारे लिप्यंतरण करणे हे काही महत्त्वाचे मुद्दे डोक्यात आले. त्यानुसार गमभनची मशागत सुरू केली. घाई न करता आज्ञायनात सुसुत्रता आणणे, स्पष्ट समजेल, कमेंट्स असतील, कारणांनुसार आज्ञायनाची विभागणी होईल ह्या सर्वांची दक्षता घेत गेलो. फायरफॉक्स आणि आयई मध्ये डॉम ऑब्जेक्ट्स् कशी हाताळावीत ह्यावर लेख वाचले. गमभनच्या तंत्रातील एक महत्त्वाची चूक तेव्हा मला दिसून आली आणि त्याकरता उपाययोजना करण्यात, चाचण्या घेण्यात बरीच मेहनत घ्यावी लागली. ह्या सुमारास फुकट आणि मुक्तस्रोत  wysiwyg एडीटर शोधणे चालू केले. अस्तित्वात असलेला असा एडीटर वापरणे हे मी स्वतःहून एडीटर लिहिण्यापेक्षा जास्त सोईचे आहे हे कळून चुकले होते. असा एडीटर शोधून त्याला गमभन बरोबर जोडता येऊ शकेल ही त्यामागची कल्पना होती. fck Editor, TinyMCE असे काही महत्त्वाचे एडीटर तपासले.परंतु  http://www.openwebware.com/products/openwysiwyg/ इथला एडीटर माझ्या पसंतीस उतरला. महत्त्वाचे म्हणजे ह्याच्या जावा पुस्तिकांचा कमी आकार, त्याचे रुपडे, त्यातल्या सोई, आयई आणि फायरफॉक्स बरोबरची कंपॅटिबिलिटी ह्या बाबी इतरांपेक्षा उजव्या वाटल्या. तसेच हा फुकट आणि मुक्तस्रोत असल्याने इतर बंधने नव्हती. जतुदितउजा बरोबर कसे जोडावे याकरता चाचण्या घेऊ लागलो. गमभनचे काही प्रमाणत पुनर्लेखन करावे लागले. नव्या संकल्पना लिहाव्या लागल्या. अखेर १७ डिसेंबर २००७ ला openwysisyg + गमभन + ५ लिप्या + फाईल सेव्ह/ओपन सोय असणारी गमभन टंकलेखन सुविधेची नवी आवृत्ती ६.१२.१७ जाळ्यावर चढवली.चित्र पहा  यात वापरलेल्या सगळ्या जावा पुस्तिकांचे एकूण आकारमान होते १२९ कि.बा.! याचसोबत विकासकांनी गमभन आणि मुक्त जतुदितउजा कसे जोडावे, गमभन कसे चालते, नव्या लिप्यांकरता कुठे काय कसे बदलावे याची माहितीही जाळ्यावर चढवली. इतर भारतीय भाषा/लिप्या ह्यांकरता ती ती भाषा जाणणारे विकासक मिळावेत या प्रयत्नांत मी होतो. त्याकरता विकीवरही गमभनचा लेख चढवला होता. परंतु ती इच्छा अजूनही पूर्ण झालेली नाही.

याहू प्लगीन, विकीकरण,मायबोली, माझे शब्द
            याचसुमारास याहूने निरोपकासाठीचे आपले api documentation विकासकांकरता खुले केले. ते पाहून,समजून घेऊन २३ डिसेंबर २००६ रोजी मी गमभनचे याहू निरोपकासाठीचे प्लगीन उपलब्ध करून दिले. याहूने आपले इंडिचॅट प्लगीन त्याचसुमारास दिले होते. अजूनही याहूने माझ्या प्लगीनला अधिकृतरित्या मान्यता दिली नसल्याने ते टेस्ट प्लगीन म्हणूनच वापरावे लागत आहे. याहू ला जाग येवो! ह्या घडीपर्यंत काही विकीकरांनी गमभन विकीत जोडण्यात यश मिळवले होते. तांत्री, युकेश अशा विकी सदस्यांनी काही अमराठी लिप्यांकरता विकीवर गमभन चालवले होते. मराठीकरता अभय नातू यांच्याशी चर्चा झाली होती पण गाडी पुढे हलली नाही. मायबोलीचे कर्ते अजय गल्लेवाले यांनीही गमभन मध्ये रस दाखवला. भविष्यात मायबोलीवर गमभन जोडण्याचा त्यांचा मानस आहे. सध्या चाचण्या चालू आहेत. माझे शब्द वर गमभन जोडता यावे याकरता राज जैन यांनी विचारणा केली होती. नुकतेच राज जैन यांनी माझे शब्द सोबत गमभन जोडले आहे.

थांबला तो संपला

डिसेंबर पासून गमभनचा वापर वाढू लागला. त्यात सतत सुधारणा होत राहिल्या/ होत आहेत.मल्याळम आणि तेलुगु ह्या लिप्या उपलब्ध झाल्या. मार्च महिन्यापर्यंत माझ्याकडे फायरफॉक्सची जुनी आवृत्ती होती आणि संगणकावर भारतीय भाषांकरता असलेली सोय उपल्ब्ध नव्हती. त्यामुळे फायरफॉक्समधल्या गमभनच्या बर्‍याच चुका मला चुका आहेत हेच पटत नव्हते. जाने २००७ ते मार्च ह्या कालावधीत चित्तरंजन भट आणि शशांक जोशी यांनी मला फायरफॉक्स आणि गमभन चे घोळ अनेकवेळा सांगितले. जोडाक्षरे, अनुस्वार, हलन्त, रफार आले की फायरफॉक्स + जतुदितउजा + गमभन ते योग्य प्रकारे दाखवत नसे. अखेर मला जाग यायला मार्च उजाडला. माझ्या दुर्दैवाने आणि आळस, दुर्लक्ष केल्याने गमभनच्या विकासातला हा सगळ्यात लांबलेला टप्पा ठरला.
ह्याच सुमारास ड्रुपल जतुदितउजा आणि गमभन जोडता येईल का याची लोकांनी विचारणा करण्यास सुरुवात केली. शंतनू, नीलकांत, राज जैन, योगेश, चित्तरंजन, शशांक सगळे असे प्रयत्न करत होते. शशांक आणि चित्तरंजन यांना यशही आले होते पण फायरफॉक्ससोबतचे गमनभनचे घोळ कायम असल्याने त्यांचेही काम खोळंबले होते. त्यात मला पीएचपी तंत्र अवगत नसल्याने मी मदत करू शकत नव्हतो. मार्चच्या मध्यात अखेर एक रात्र जागवल्यानंतर हा घोळ सुटला. ह्याकामी चित्तरंजनची मोलाची साथ लाभली.  शशांकचे मार्गदर्शन आधीच लाभले होते. अखेर चाचण्या संपवून ३१ मार्चला नवी आवृत्ती ७.०३.३१ अवतरली. चित्र पहा  त्यानंतर पीएचपी शिकून, ड्रुपल बरोबर गमभन जोडण्याचे उद्योग केले आणि तेही फळास आले.

ड्रुपल बरोबर जोडणी, उपक्रमची सुरुवात, सुरेशभट.इन् ची सुरुवात, माझे शब्द आणि गमभनची जोडणी,  ऑटोकरेक्शन, गाभ्यातील बदल, जावा पुस्तिकांचा कमी कमी होत जाणारा आकार असे सगळे हल्लीचे बदल आणि यापुढील सगळी वाटचाल उपक्रमावर आहेच. मनोगतावरही गमभनच्या नव्या आवृत्त्या आल्या की माहिती देत होतो. आज साधारण वर्षभर( एखाद दोन महिने जास्तच) उलटल्यावर केलेल्या कामाचा,मेहनतीचा आढावा घ्यावा असे मनात आले. एखादवेळेस तुम्ही यास आत्मप्रौढी म्हणाल पण जे होते ते असे होते आणि जे आहे ते असे आहे हे मांडण्याच हा माझा एक प्रयत्न आहे इतकेच. या अनुषंगाने एखाद्या मोफत आणि मुक्त स्रोत सुविधेच्या जडणघडणीतले महत्त्वाचे टप्पे,अडथळे, पर्याय, मदत करणारे हात, उपयोग, वेळ, पैसा, श्रम यांचा मला आणि इतर नेटकरांना आढावा घेता यावा म्हणून हा उद्योग. याकामात मदत करणारे मनोगतकर्ते वेलणकर, मयुरेश वैद्य, अभिमन्यू आळतेकर, दंतकर्मी, शंतनू ओक, चित्तरंजन भट, शशांक जोशी, नीलकांत, योगेश, राज जैन, अजय गल्लेवाले, युकेश, तांत्री, आर्य चाणक्य या सर्वांचा मी आभारी आहे. गमभनची दखल घेणार्‍या, आपल्या ब्लॉग्सवर गमभनची माहिती देणार्‍या, गमभन वापरणार्‍या आणि इतरांस गमभन वापरण्यास प्रवृत्त करणार्‍या सर्वांचा मी ऋणी आहे .अनावधानाने कोणाचे नाव राहून गेले असल्यास क्षमस्व.

ॐकार जोशी
०६-मे-२००७.